वाशिम: मारसूळ (ता.मालेगाव) येथील गोडावूनमधून ६ क्विंटल सोयाबीन लंपास करणाऱ्या पाच चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती ८ मे रोजी पोलिस प्रशासनाने दिली. मारसूळ येथील शेतकरी अरुणराव शंकरराव घुगे (५२) यांच्या फिर्यादीनुसार, २७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या गोडावूनमधून ६ क्विंटल सोयाबीन लंपास केली होती. यप्रकरणी मालेगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पाच आरोपींबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शुभम मधुकर खंडारे (वय २६), आकाश वसंत खंडारे (वय २७), सोनू प्रभू लठाड (वय २७), श्याम शिलपत पवार (वय २४) सर्व रा.चिखली, ता.मंगरूळपीर व स्वप्नील देवानंद जाधव (वय २०) रा.रामराववाडी, मंगरूळपीर यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून १ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे एकूण २७ क्विंटल सोयाबीन, ७३ हजार ६०० रुपये किंमतीचा १६ क्विंटल हरभरा, १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची १८ क्विंटल तूर व गुन्ह्यात वापरलेले एमएच ३० बीडी ५०५४ क्रमांकाचे टाटा एस. वाहन असा एकूण ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे व योगेश धोत्रे, पोलीस अंमलदार प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, दिपक घुगे, विठ्ठल महाले व संदिप डाखोरे यांनी पार पाडली.
इतर हद्दीतील १० गुन्हेही उघड
उपरोक्त आरोपितांकडून पो.स्टे.मालेगाव येथे दाखल व हद्दीतील ३ शेतमाल चोरीचे गुन्हे, पो.स्टे. शिरपूर येथे दाखल व हद्दीतील २ शेतमाल चोरीचे गुन्हे, पो.स्टे. रिसोड येथे दाखल व हद्दीतील २ शेतमाल चोरीचे गुन्हे व पो.स्टे.मंगरूळपीर येथे दाखल व हद्दीतील ३ शेतमाल चोरीचे गुन्हे असे एकूण १० विविध कलमान्वये दाखल शेतमाल चोरीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले . या गुन्ह्यांतील ५ आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पो.स्टे.मालेगाव यांच्या ताब्यात देण्यात आला.