एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ईटीएम आता कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात येत आहे. एसटी महामंडळाला तब्बल १९ हजार बसच्या माध्यमातून महिन्याकाठी कोट्यवधींचा महसूल मिळत होता. हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाने आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून ४५ हजार मशीन्स खरेदी केल्या आहेत. संबंधित कंपनीच्या सूचनेनुसार या मशीन्सची वयोमर्यादा पाच वर्षे आहे. मात्र, या मशीन्सची खरेदी करून आठ वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. या मशीन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रस्तही झाले असून, अनेक वाहकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील चार आगारांत मिळून ३९८ पैकी १९९ म्हणजेच ५० ईटीएम नादुरुस्त आहेत.
----------------
दुरुस्तीनंतरही वारंवार बिघाड
एसटीच्या तिकीट मशीन बिघडल्यानंतर त्या दुरुस्तीसाठी अकोला येथील विभागीय कार्यशाळेकडे पाठविल्या जातात. ईटीएमचा करार असलेल्या कंपनीचे आगारस्तरावरील प्रतिनिधीद्वारेच या मशीन दुरुस्तीसाठी पाठविल्या जातात. त्या दुरुस्तीनंतर परत वापरात घेतल्यानंतर आठवडाभरातच त्यात पुन्हा बिघाड होतो. भर रस्त्यात त्यामुळे बस थांबवावी लागते. या प्रकाराचा वाहकांना वैताग आला आहे.
-----------------------
कंपनीकडे सुटे भागही नाहीत
एसटीच्या ईटीएम मशीनचा करार ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीकडूनच बिघाड झालेल्या किंवा नादुरुस्त मशीन दुरुस्त केल्या जातात. यासाठी आगारस्तरावर नियुक्त कंपनीचे प्रतिनिधी नादुरुस्त मशीनची माहिती घेऊन त्या विभागीय कार्यशाळेत पाठवितात. आता मात्र या कंपनीकडे मशीनमधील निकामी झालेले सुटे भाग बदलण्यासाठी नवे सुटे भागच उपलब्ध नसल्याचे कळले आहे.
--------------
कोट : आगारात उपलब्ध ९८ ईटीएमपैकी केवळ ३० ईटीएमच सुस्थितीत आहेत. उर्वरित मशीन नादुरुस्त असल्याने आता पारंपरिक ट्रेचा वापर करावा लागत आहे. काही मशीन दुरुस्त करण्याच्याही स्थितीत राहिल्या नाहीत.
-मुकुंद न्हावकर, आगार प्रमुख
कारंजा
--------------
१) -एकूण ईटीएम -३९८
२)- नादुरुस्त ईटीएम -१९९
---------
जिल्ह्यातील तिकीट मशीनची स्थिती
आगार - एकूण मशीन - नादुरुस्त
वाशिम -११९ -६९
कारंजा -९७ -६७
मं.पीर -९८ -५०
रिसोड -७४ -१३
-----------------------------