लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील चारही आगारांत वाहकांसाठी उपलब्ध केलेल्या इलेक्ट्रिक तिकीट मशीन डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील चारही आगारांतील मिळून ५० टक्के ‘ईटीएम’ नादुरुस्त असल्याने बंद आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणी येत आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत पूर्वीच्या पद्धतीनुसार ट्रेचा आधार घेण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यातुन धावणाऱ्या विविध बसेसमध्ये बरेचदा दिसते.
वाहकांकडून आकड्यांची जुळवाजुळवजुन्या मशीनचे प्रशिक्षण साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी देण्यात आलेले आहे. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले. परंतु, इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जुन्या ट्रे वापराचा विसर पडला आहे. प्रशिक्षण नसल्याने चुकीचे तिकीट जाण्यासह कारवाईही अंगलट येण्याची भीती व्यक्त होत असून, वाहकांना आता किती तिकिटे गेली, त्याचे पैसे किती याचा हिशेब करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या कसरतीमुळे चारही आगारातील वाहक पुरते वैतागल्याचे दिसत असून, अनेकदा रस्त्यात ईटीएम खराब झाल्यानंतर त्यांची त्रेधातिरपीटही उडते. अशात प्रवाशांना तिकीट कसे द्यावे हा प्रश्न त्यांना पडतो.
आगारात ९८ ईटीएमपैकी केवळ ३० ईटीएमच सुस्थितीत आहेत. उर्वरित मशीन नादुरुस्त असल्याने आता पारंपरिक ट्रेचा वापर करावा लागत आहे. काही मशीन दुरुस्त करण्याच्याही स्थितीत राहिल्या नाहीत. -मुकूंद न्हावकर, आगार प्रमुख, कारंजा