वाशिम : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत गत वर्षभरात ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
राज्य शासनाने २०१२ मध्ये राजीव गांधी नावाने आणि आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३ शासकीय आणि ९ खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनांची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना आहेत. अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयानेसुद्धा विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णालयातील आरोग्य मित्रांनी योजनांची तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना देणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कोविड-१९ वरील उपचारासाठी २० पॅकेजेस व म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी १९ पॅकेजेस उपलब्ध आहेत. गत वर्षभरात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आरोग्य विभागाला ५१ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे.
००००००
बॉक्स
अशी आहे खर्च मर्यादा
जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून प्रति कुटुंबाला १.५ लाख रुपयांच्या मर्यादेत विविध ९९६ आजारांवर उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी खर्च मर्यादा २.५ लाख रुपये आहे. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी २०११ च्या सामाजिक आर्थिक जातीय जनगणनेच्या आधारे लाभार्थी निवड करण्यात आली आहे. या लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच देण्यात आले असून त्यांना विविध १२०९ उपचार उपलब्ध आहेत.
००००००
बॉक्स
तक्रारीचे स्वरूप काय?
जनआरोग्य योजनेत पात्र असूनही लाभ मिळत नाही, या योजनेत समावेश झालेला असतानाही औषधी व उपचारासाठी काही पैसे घेण्यात आले अशा स्वरूपाच्या तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू आहे.
००००
बॉक्स
तक्रार कुणाकडे करावी?
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत काही शंका, अडचणी किंवा तक्रार असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयकांकडे तक्रार नोंदविता येणार आहे.
०००
कोट बॉक्स
या योजनांची माहिती रुग्णांना देण्यासाठी सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अनुषंगाने १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
- डॉ. रणजित सरनाईक
जिल्हा समन्वयक, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना
०००
जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालये - १२
मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी खर्च मर्यादा - २.५ लाख
आतापर्यंत रुग्णांवर मोफत उपचार - ६४०२
उपचारासाठी खर्च किती - २४.६२ कोटी
०००००००