वाशिम : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तीन मध्यम आणि १0७ लघु प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून, २१ ऑक्टोबरपर्यंत या प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. परतीचा पाऊस न बरसल्याने जलसाठय़ामध्ये ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. जिल्ह्यातील एकबुर्जी, सोनल आणि अडाण या तीन मोठय़ा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या वाशिम जिल्ह्याची तहान भागविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पांतील जलसाठय़ामध्ये वाढ होवू शकलेली नाही. एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात, सोनल प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणि अडाण प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या अल्प पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यानंतर या प्रकल्पांमध्ये पाणीपातळी वाढविण्याच्या दृष्टीने एकदाही पाऊस झालेला नसून, दुसरीकडे उन्हाचा पाराही चढत असल्याने या प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठय़ामध्ये बाष्पीभवनामुळे झपाट्याने घट होत आहे. प्रकल्पांच्या जलसाठय़ाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, ५२ टक्के पाणीसाठा प्रकल्पांमध्ये आहे. मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे लघु प्रकल्प कोरडा पडला आहे, तर जिल्ह्यातील १0७ लघु प्रकल्पांपैकी १0 प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांच्या आत जलसाठा जलाशयाच्या पातळी अहवालावरून दिसून येतो.
वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांत ५२ टक्के जलसाठा
By admin | Published: October 22, 2015 1:41 AM