लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: चालूवर्षीचा पावसाळा संपत आला असताना संततधार तथा मोठा पाऊस अद्याप झाला नसल्याने जिल्ह्यातील १२६ पैकी तब्बल ५४ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर असून २0 प्रकल्पांमध्ये शून्य ते १0 टक्के, २६ प्रकल्पांमध्ये १0 ते २५ टक्के आणि २३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास भविष्यात उद्भवणार्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करता यावी, यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवण्याकरिता प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे.वाशिमच्या एकबूर्जी जलाशयातून दरवर्षी परिसरातील शेतकर्यांच्या रब्बी हंगामातील पिकांकरिता सिंचनासाठी पाणी सोडले जाते. यासह संपूर्ण वाशिम शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मात्र समाधानकारक पावसाअभावी एकबूर्जी प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही. लघुपाटबंधारे विभागाने २३ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमधील शिल्लक जलसाठय़ाच्या आकडेवारीमध्ये एकबुर्जीत आजरोजी केवळ १६.४६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने शहरात ८ दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेवून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील इतर मध्यम व लघू प्रकल्पांच्या जलाशय पातळीतही यंदा पावसाअभावी वाढ झालेली नाही. चालु आठवड्यात तीन ते चार दिवस पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ांवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १.१४ आणि २९.१४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचे दिसून येते. तसेच १२३ लघुप्रकल्पांमधील जलसाठय़ाची स्थितीही चिंताजनक आहे. सद्य:स्थितीत वाशिम तालुक्यातील ३२ लघुप्रकल्पांमध्ये सरासरी ६.५५ टक्के जलसाठा शिल्लक असून तब्बल २१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. मालेगाव तालुक्यातील २१ प्रकल्पांपैकी ८, रिसोड १८ पैकी १0, मंगरुळपीर १५ पैकी ६, मानोरा येथील २३ पैकी ६ आणि कारंजा तालुक्यातील १४ प्रकल्पांपैकी ३ मध्ये आजमितीस शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाशिमसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत असून यापुढे मोठा तथा संततधार पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत. दरम्यान, टंचाईसदृष परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा प्रशासन, नगर पालिका, ग्रामपंचायतींनी आपापल्या क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचे प्रयत्न चालविले असल्याचे दिसून येत आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ २४ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’!अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये असणार्या प्रकल्पांची पाणीपातळी खालावली असून पिण्याकरिता पाणी राखून ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. गुरूवार, २४ ऑगस्टला याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ होत असून पिण्याचे पाणी राखून ठेवण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबूर्जी प्रकल्पात यंदा अपेक्षित प्रमाणात पाणीसाठवण झालीच नाही. सद्या प्रकल्पात केवळ १६.४६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने नगर परिषदेमार्फत नियोजनाच्या दृष्टीकोणातून ८ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनीही नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. - राहुल तुपसांडेपाणीपुरवठा सभापती, नगर परिषद, वाशिम