संतोष वानखडे
वाशिम : गतवर्षभरात जिल्ह्यातील ५४३ जणांना सापाने दंश केला असून, यापैकी दोन जणांचा जागीच तर एका जणाचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने दंश केल्यानंतर मृत्यू ओढवण्याच्या घटनेत कमालीची घट झाली आहे.
साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात शेतात साप चावण्याच्या घटना घडतात. सापापासून बचाव म्हणून शेतात काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात विषारी सापाच्या केवळ चार प्रजाती असून काही निमविषारी साप वगळता जिल्ह्यात प्रामुख्याने धामण, दिवड, कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, तस्कर, नानेटी, धूळनागीण, कुकरी, सळई इत्यादी बिनविषारी साप आढळून येतात. अनेकवेळा घाबरून किंवा स्वत:च्या संरक्षणासाठी साप चावतो. गत वर्षभरात जिल्ह्यात ५४३ जणांना सापाने दंश केला. यापैकी दोन जणांचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी मेडशी येथील एकाचा अकोला येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. घराजवळ तसेच शेतात साप आढळला तर सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांचे संवर्धन करण्यास मदत करा, असा सल्ला सर्पमित्र, डॉक्टरांनी दिला.
०००००
साप आढळला तर!
१) सापाला ठार न करता आणि न डिवचता सर्पमित्राला पाचारण करावे.
२) साप एका जागेवर थांबत नाही, म्हणून त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे.
३) सापजवळ जाण्याचे टाळून त्याचा व स्वत:चा बचाव करावा.
साप चावल्यावर काय दक्षता घ्यावी
१) सर्पदंश झाल्यावर सुरुवातीचा एक तास हा रुग्णासाठी वेदनादायक असतो.
२) सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्या व्यक्तीस धीर द्यावा, जास्त चालणे, झोपणे टाळावे.
३) जखम जंतूनाशकाने स्वच्छ करावी.
४) शक्य तेवढ्या लवकर रुग्णालयात दाखल व्हावे
००००
कोट
जिल्ह्यात वर्षभरात ५४३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. दवाखान्यात आल्यानंतर योग्य उपचार करून सर्पदंश झालेला व्यक्ती लवकरात लवकर बरा होतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता शक्य तेवढ्या लवकर दवाखान्यात यावे.
- डॉ. अनिल कावरखे
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम
००००
कोट
जिल्ह्यात केवळ चारच प्रमुख विषारी साप आहेत. जैवविविधता जपण्यासाठी सापांचे अस्तित्व अतिआवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे घर परिसरात साप आढळल्यास सर्पमित्राशी संपर्क साधावा.
- सर्वेश फुलउंबरकर
सर्पमित्र तथा वन्यजीवरक्षक, वाशिम