संतोष वानखडे
वाशिम : मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून, ५५ गावांची तहान भागविण्यासाठी ५३ ठिकाणी विहिर अधिग्रहण तर २ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे तिमाही आराखडे तयार केले जातात. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत जिल्ह्यातील १२६ गावांत पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज पाणीटंचाई कृती आराखड्यातून वर्तविला होता. १३४ गावांत विहिर अधिग्रहण तर १० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा प्रस्तावित असून, या उपाययोजनांसाठी ९२ लाख १६ हजारांचा निधी प्रस्तावित आहे.
२६ मे पर्यंत जिल्ह्यातील ५५ गावांत पाणीटंचाईच्या झळा तिव्र झाल्या असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या. ५३ गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले तर वनोजा (ता.मंगरूळपीर) व गंगापूर (ता.कारंजा) अशा २ गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्यात उन्हाची तिव्रता कमालिची वाढली असून, प्रकल्पांतील जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. शहरी भागातही पाणीकपात केली जात असून, कुठे तीन दिवसाआड तर कुठे सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.विहिर/बोअर अधिग्रहण
तालुका / गावेवाशिम / ६मालेगाव / ५रिसोड / ३मानोरा / १३मं.पीर / १२कारंजा / १४एकूण / ५३