वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण केली आहे. परीक्षा न घेता सीबीएसईच्या दहावीतील विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहेत. या निर्णयाबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५५० विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत. कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. याचा फटका शिक्षण क्षेत्राला जबर बसला असून, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शेवटी सीबीएसईने परीक्षा न घेताच दहावीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत.
००००
पालक काय म्हणतात...
कोरोनामुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले, ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही संभ्रम निर्माण करणारी आहे. तंत्रनिकेतन किंवा अन्य शाखेत कोणत्या आधार प्रवेश होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
- माणिक इंगळे, पालक,
०००
कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता आल्या असता, परीक्षा न घेता पास करणे तेवढे उचित नाही. विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
- विनोद वानखडे,पालक
०००
दहावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. या परीक्षेतील गुणानुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतात. परीक्षाच नसल्याने गुणदान कसे होईल, हे अद्याप निश्चित नाही. यामध्ये स्पष्टता यायला हवी.
- दीपक देशमुख, पालक
००००
कोरोनामुळे सीबीएसईने दहावीची परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पास करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेक कसोट्यांवर खरा कसा उतरेल, याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. परीक्षा नसल्याने गुणदान पद्धत ठरविताना अनेक अडचणी येऊ शकतात. मेरिट लिस्टनुसार पुढच्या वर्गात प्रवेश देताना संभ्रम राहील.
सतीश सांगळे, शिक्षक
००००
अकरावी प्रवेशाबाबत द्विधास्थिती
सीबीएसईने दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास केले. मेरिट लिस्टनुसार अकरावी, आयटीआयचे प्रवेश नेमके कसे होणार, हे स्पष्ट नाही. प्रवेश परीक्षा घेऊन कदाचित प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, याबाबत स्पष्टता हवी.
००
गुणदान समपातळीवर कसे आणणार?
पेपर सोडविल्यानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळतात. दहावीतील गुणानुसार, त्याला कोणत्या शाखेला प्रवेश द्यावयाचा याचा निर्णय सुलभ होऊ शकतो. परीक्षा नसल्यामुळे गुणदान समपातळीवर आणण्यासाठी प्रवेश परीक्षा होऊ शकते.