लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी मिळावे, या उद्देशाने पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजना राबविली जात आहे. याअंतर्गत ३० जून २०१७ पर्यंत सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात मात्र या मुदतीपर्यंत केवळ ४०० विहिरींची कामे पूर्ण झाली असून ५६०० विहिरींची कामे अद्याप प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २०१६ पर्यंत अर्ज स्वीकारून १० जानेवारी २०१७ पर्यंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपर्यंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतू या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. त्यामुळे लाभार्थींची निवड करण्यास विलंब लागला. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांकडून प्राप्त १८ हजार ४४५ अर्जांपैकी ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरविण्यात आले; तर प्रत्यक्षात ६ हजार लाभार्थींची विहिरीकरिता निवड करण्यात आली. त्यापैकी जूनअखेर ४ हजार विहिरींची कामे सुरू होऊ शकली. मात्र, ३० जून २०१७ या अंतीम मुदतीपर्यंत त्यातील उण्यापूऱ्या ४०० विहिरींचीच कामे पूर्ण होऊ शकली असून उर्वरित ३६०० विहिरींची कामे सुरू असून जवळपास २००० विहिरींच्या कामांना अद्याप मुहूर्तच सापडलेला नाही.