जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. प्रामुख्याने जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने कहर केला होता. अनेक शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या फळपिकांनाही फटका बसला. जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शासनाकडे २ कोटी १२ लाख ७३ हजार ८२६ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पाच शेतकऱ्यांचे १.१० हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचे, ३९४४ शेतकऱ्यांचे २२४३.५७ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले, तर १६८८ शेतकऱ्यांच्या ४८१.२५ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच खरडून गेल्या आहेत.
०००००००००००००००००००००००
पंचनाम्यास लागला विलंब
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जुलैच्या मध्यंतरापर्यंतच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली, परंतु शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही प्रशासनाला पंचनामे करण्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे अंतिम अहवाल तयार करून शासनाकडे मदतीची मागणी करण्यासही विलंब झाला.
०००००००००००००००००००००००
३ ऑगस्ट रोजी पाठविला प्रस्ताव
जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी पंचनाम्यास मोठा विलंब लागला. त्यामुळे प्रत्यक्ष ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झालेल्या नुकसानीचे अंतिम अहवाल आपत्ती व्यवस्थापनास मिळण्यास विलंब झाला. तालुकास्तरावरून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.
०००००००००००००००००००००००
तीन तालुक्यात नुकसान
जिल्ह्यात जून, जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका केवळ तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला, त्यात मंगरूळपीर तालुक्यातील ४२६८, वाशिम तालुक्यातील २७, तर मानोरा तालुक्यातील १३४२ शेतकऱ्यांचे मिळून २७२५.९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, रिसोड आणि कारंजा या तीन तालुक्यात मात्र निकषानुसार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही.
---------
नुकसानीचे पीकनिहाय क्षेत्र पीक हेक्टर - क्षेत्र हेक्टर
सोयाबीन- १६२६.४९
तूर - ४०८.३३
कापूस - १६६.५५
मूग - ११
हळद - ०३
ज्वारी - १३
इतर जिरायत - १४.२०
फळपिके - १.१०
---------------------
खरडून गेलेले क्षेत्र - ४८१.२५ हेक्टर ०००००००००००००००००
कोट: जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर शासन निकषानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करणारा प्रस्ताव आयुक्तस्तरावर पाठविण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा केली जाईल.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम