लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता ९०० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले. असे असताना खरीप हंगाम महिनाभरावर आला असताना केवळ ३७४ कोटींचे वाटप झाले असून हे प्रमाण ४१ टक्के असून ५९ टक्के वाटप अद्याप अपूर्ण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अडथळा जाणवत असल्याचे दिसून येत आहे.चालू वर्षी कृषी विभागाकडून ४ लाख ६ हजार ४५० हेक्टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ९०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ४६ हजार ८८५ शेतकऱ्यांना ३७४ कोटी ९३ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ‘लाॅकडाऊन’च्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील बॅंका सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची या निर्धारित वेळेत बॅंकांमध्ये गर्दी होतत असल्याचे दिसून येत आहे. पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे पालमंत्र्यांचे निर्देशमागील वर्षी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, अशा शेकडो शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यावर्षी मात्र अशा तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोना संकटकाळ असतानाही शेतकरी तग धरून आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज, बियाणे व खत वेळेत उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी १ मे रोजी झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले.
वाशिम जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे ५९ टक्के उद्दिष्ट अपूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 10:54 AM