ऑनलाइन लोकमत/नंदकिशोर नारे
वाशिम, दि. 10 - शेतातील धु-यावर बोरांची झाडे लावून व त्यावर ‘पातुरी’ नामक बोराची कलम करुन शिरपूर येथील शेतकरी वार्षिक ६० हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. शेतीच्या धु-याचा योग्यप्रकारे वापर करुन त्यातून उत्पन्न घेणा-या शेतक-याचे परिसरात कौतूक होत आहे.
शेतीच्या धु-याचा वापर अनेक शेतकरी काडी कचरा, निंदनाचे गवत टाकण्यासाठीचं वापर करतात. शिरपूर जैन येथील विलास वाघमारे नामक शेतक-याने आपल्या पांगरखेड शिवारातील ३० एकर शेतातील धु-यावर ५० बोरीची झाडे लावलीत त्या झाडांवर पातुरी वाण असलेल्या बोरांची कलम केली. तसेच १०६ सागाची झाडे सुध्दा लावण्यात आलीत. या झाडांचे योग्य संगोपन केल्याने आजमितीला झाडांना लागलेल्या बोरांमुळे झाडे वाकली आहेत. काही झाडांना बांबु लावण्यात आले आहेत. परिसरातील नागरिक दररोज या झाडांची बोरे मोठया प्रमाणात मोफत घेवून जावूनही वाघमारे यांना वार्षिक ६० ते ६५ हजार रुपयांचे उत्पन्न होत आहे. सद्यस्थितीत बोरांचे भाव चांगले असल्याने यामध्ये वाढ होण्याची शक्यताही वाघमारे यांनी वर्तविली आहे.