लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून घेतल्या जाणारी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी पार पडली. त्यात जिल्ह्यातील ३० शाळांमधील ६१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६०७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी दिली.आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठव्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी ‘एनएमएमएस’ ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सामान्य बौद्धीक क्षमता (१०० गुण), शालेय क्षमता (१०० गुण), विज्ञान (४० गुण), गणित व भूमिती ((२० गुण) आणि समाजशास्त्र (४० गुण) आदी विषयांचा त्यात समावेश असतो. यात उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. दरम्यान, यंदा या परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा आणि कारंजाच्या जे.डी.चवरे हायस्कुल अशा दोन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. वाशिमच्या केंद्रावर वाशिम, मालेगाव आणि रिसोड तालुक्यातील १३ शाळांमधील विद्यार्थी; तर कारंजाच्या केंद्रावर कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या तीन तालुक्यातील १७ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता परीक्षा सुरळितपणे पार पडली, अश्ी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नागरे यांनी दिली.
वर्षागणिक घटतोय प्रतिसाद!जिल्ह्यात गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पुर्वी ८ केंद्रांवरून परीक्षा घेतली जायची. गतवर्षी चार केंद्रांवरून परीक्षा झाली; तर यंदा मात्र केवळ दोनच परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांचा घटता प्रतिसाद यास कारणीभूत मानला जात असून शासनस्तरावरून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची रक्कम प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.