वाशिम : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गंभीर झाले असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ हा संसर्गजन्य आजारही येऊन ठेपला आहे. सीटीचा स्कोअर २२ आणि आरटीपीसीआरचा अहवाल पाॅझिटिव्ह असलेल्या ६२ वर्षीय महिलेचा ११ मे रोजी रात्री दोन वाजता ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने जिल्हाभरात खळबळ माजली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिसोड तालुक्यातील मोप येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने ती २९ एप्रिल रोजी वाशिम येथील जिल्हा कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाली होती. सीटी स्कॅन चाचणीचा स्कोअर २२ होता. त्यामुळे परिस्थिती गंभीर होती. अशात ११ मे रोजी सदर महिलेच्या डोळ्याला अचानक सूज आली. संबंधित डाॅक्टरांनी तपासणी करून ‘म्युकरमायकोसिस’ असल्याचे निदान केले आणि तीला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र यावेळी संबंधित महिलेसोबत कोणीही पुरूष नातेवाईक उपस्थित नव्हता. त्यामुळे तातडीने अकोला हलविणे शक्य झाले नाही. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास तीचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापाठोपाठ जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ हा आजारही दाखल झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मोप येथील ६२ वर्षीय कोरोना बाधित महिलेस ‘म्युकरमायकोसिस’ जडल्याचे निदान ११ मे रोजी झाले. तीची प्रकृती गंभीर असल्याने तीला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा निर्णय घेतला; मात्र सोबत कोणीही पुरूष नातेवाईक नसल्याने त्यास थोडा विलंब झाला. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास तीचा मृत्यू झाला. तथापि, या आजाराने ग्रस्त असलेला इतर कोणी रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये भरती आहे का, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.- डाॅ. मधुकर राठोडजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम