वाशिम : नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून खरीप पीक विमा योजनेकडे यावर्षी शेतकरी मोठय़ा संख्येने वळले आहेत. वाशिम जिल्हय़ात यावर्षी १ लाख ५१ हजार ८४४ शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे. त्यापोटी १0 कोटी ८२ लाख ३३ हजार ४४७ रुपयांचा हप्ता भरल्या गेला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील चार लाख २६ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी एक लाख ४७ हजार ७९८ हेक्टरवरील पिकाचा विमा प्रत्यक्षात काढला गेला आहे. जिल्हय़ातील दोन लाख ४२ हजार शेतकर्यांपैकी एक लाख ५२ हजार ४६0 शेतकर्यांनी प्रत्यक्षात विमा काढला असून, त्याची टक्केवारी ६३ अशी येते.गतवर्षी जिल्हय़ातील ६0 टक्के शेतकर्यांनी विमा काढला होता. या पैकी ८१ टक्के शेतकर्यांना प्रत्यक्षात विम्याचा लाभ झाला. त्यामुळे चालू खरीप हंगामामध्ये विमा काढणार्या शेतकर्याचे ३ टक्केने वाढले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा लागू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी या योजनेत सहभाग घेणार्या शेतकर्यांची संख्या ही ३ ते ५ टक्क्याच्या आत होती; मात्र गत दोन वर्षात शेतकर्यांना आलेला लहरी हवामानाचा अनुभव आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून पीक विमा काढणार्या शेतकर्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्हय़ात प्रामुख्याने ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, कापूस, कांदा, मका, भूईमूग, बाजरी, या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रत्येक पिकासाठी वेगळा हप्ता ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भातील आत्महत्याग्रस्त वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि वर्धा या जिल्हय़ातील अल्पभूधारक शेतकर्यांना पीकविम्याच्या हप्त्यात ५0 टक्के सूट दिल्या गेली आहे. त्याचाही शेतकर्यांना लाभ होत आहे.
६३ टक्के शेतक-यांनी काढला विमा
By admin | Published: August 17, 2015 1:36 AM