वाशिम : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत दरवर्षी आरटीई-२५ टक्के प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. यावर्षी सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्राकरिता पहिली लॉटरी काढली असता, जिल्ह्यातील ६३० बालकांची निवड झाली असून, ते मोफत प्रवेशाकरिता भाग्यवंत ठरले आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी सहाही तालुक्यात १०३ शाळांमध्ये ७०९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ७०९ जागांकरिता १ हजार ११९ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यानंतर ७ एप्रिलला पुण्यातून एकाच वेळी लॉटरी काढण्यात आली असून, १५ एप्रिलपासून पालकांच्या मोबाइल निवड झाल्यासंदर्भात संदेश धडकायला लागले. या पहिल्या सोडतीमध्ये ६३० बालकांची निवड झाली आहे. त्यामुळे आता यातील किती विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतात आणि किती गळतात यावरून इतर बालकांच्या प्रवेशाची निश्चिती होणार आहे.
----------------------------------------
लॉकडाऊनमुळे प्रवेशाला ब्रेक
ज्या बालकांची पहिल्या सोडतीत निवड झाली असेल त्यांच्या पालकांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होणार आहे. पालकांनी फक्त संदेशावर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पाहावा लागणार आहे. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रवेशाची तारीख लॉकडाऊननंतर जाहीर केली जाणार आहेत. तोपर्यंत बालकांना व पालकांनाही प्रवेशाकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
------------------------------------
जिल्ह्यातील १०३ शाळांमधील ७०९ जागांकरिता पहिल्या सोडतीत ६३० बालकांची निवड झाली आहे. या निवडीसंदर्भात पालकांच्या मोबाइलवर संदेश यायला सुरुवात झाली आहे. सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन असल्याने प्रवेशाची तारीख निश्चित केलेली नाहीत.
अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, वाशिम
-----------------------------------------
आरटीईअंतर्गत शाळा-१०३
प्रवेश क्षमता-७०९
प्राप्त अर्ज-१११९
निवड झालेले-६३०