शिरपूर जैन : शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तीन हजार लोकसंख्येच्या गोवर्धना गावात गत महिनाभरात जवळपास ७१२ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी तब्बल ६४७ जणांनी हिंमत न हारता धैर्याने आणि सकारात्मक विचाराने कोविड सेंटर, गृहविलगीकरणात राहून औषधोपचार घेतला आणि कोरोनावर मात केली.
शिरपूरपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे मागील एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सुरुवातीला कमी प्रमाणात निष्पन्न होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये १४ एप्रिल रोजी २१०, १६ एप्रिल रोजी पुन्हा २०७ आणि १७ एप्रिल रोजी ११५ रुग्ण आढळून आले होते. महिनाभराच्या कालावधीत ७१२ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने अॅक्शन मोडवर येत गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. तहसीलदार अजित शेलार व तालुका आरोग्य अधिकारी फोकसे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने गावातील जवळपास सर्वच नागरिकांची कोरोना चाचणी केली. बाधितांपैकी काहींना वाशिम व सवड येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे गावातच विलगीकरण केले. कोरोनाबाधितांचे समुपदेश करीत धीर धरा, औषधोपचार आणि सकारात्मक विचाराने लवकरच कोरोनावर मात करून घरी सुखरूप परत या, असा आत्मविश्वास कुटुंबीय, गावकरी व प्रशासनाने रुग्णांमध्ये जागविला. लवकर निदान व उपचार, नियमित औषधोपचार, सकारात्मक विचार आणि गावकरी, प्रशासनाचा मानसिक आधार या बळावर गोवर्धन येथील ६४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ते सर्वजण ठणठणीत आहेत. सद्यस्थितीत केवळ ५५ जण सक्रिय असल्याची माहिती मांगुळ झनक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत शिंदे यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस, पंचायत समिती, स्थानिक ग्रामपंचायत, आशा, अंगणवाडी सेविका यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. त्यामुळे लवकरच परिस्थिती नियंत्रणात आली, असे तहसिलदार अजित शेलार यांनी सांगितले.