वाशिम : जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम तसेच घरेलू कामगारांची संख्या साडेसहा हजार असून, त्यापैकी ६५ टक्के कामगार अशिक्षितच असल्याची माहिती समोर आली आहे.असंघटित कामगारांत मोडणार्या या कामगारांवर अन्याय होऊ नये, त्यांना संघटितपणे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याची सोय व्हावी म्हणून शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कामगार कार्यालय वा पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून असंघटित अशा घरेलु कामगार व इमारत वा इतर बांधकाम करणार्या नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन्ही प्रवर्गात महिला व पुरुषांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आजतागायत वाशिम जिल्ह्यात इमारत व इतर बांधकामातील ११६२ तर घरेलु कामगारांची ५१९७ मिळून ६ हजार ३५९ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या इमारत व इतर बांधकामातील कामगारांना घरेलु वस्तूसांठी तीन हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाते. घरेलु कामगाराची नोंदणी झाल्यानंतर त्याला वयाच्या पाच वर्षांनंतर सन्मानधन योजनेंतर्गत १0 हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते. त्या कामगाराला जोडीदारासह विमा संरक्षण, महिला असल्यास दोन प्रसूतींपर्यंत १0 हजाराचे अर्थसहाय्य, कामगाराच्या पाल्याची शिकत असलेल्या शाळेत ७५ टक्के उपस्थिती असल्यास त्याला शिष्यवृत्ती तसेच नोंदणीनंतर कामगाराला अपंगत्व वा मृत्यू आल्यास अर्थसहाय्याची सोयही शासनाने केली आहे. वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हय़ामध्ये दुकाने, व्यापारी संस्था, लॉजिंग, हॉटेल्स सिनेमा थियेटर नाट्यगृह या अंतर्गत एकूण १ हजार ११४ संस्था तसेच सदर संस्थांमध्ये एकूण ३ हजार २२ कामगार असल्याची अधिकृत नोंदणी आहे. या शिवाय कामगार नसलेल्या एकूण पाच हजार ९७१ संस्थाचीसुद्धा अधिकृत नोंद झालेली आहे. वाशिममध्ये ५४३ दुकानांमध्ये ८४0 कामगार, कर्मशियल तसेच बँका व अन्य व्यापारी संस्था असलेल्या ३६३ संस्थांमध्ये १४५ कामगार, १२३ हॉटेल्समध्ये ३४५ कामगार, पाच लॉजींगमध्ये नऊ, चार नाट्यगृह सिनेमा थिएटरमध्ये २१ कामगार प्रत्यक्ष कामावर आहेत. दोन हजार २६६ असलेल्या सर्व संस्थांमध्ये एकही कामगार नाही. कारंजा येथील सर्व ४९३ नोंदणीकृत संस्थांमध्ये ११९२ कामगार तर मंगरुळपीर येथील २६३ संस्थांमध्ये ४७९ कामगारांची नोंद आहे. कारंजा येथील २६९१ व मंगरुळपीर येथील १0२४ दुकाने व संस्थांमध्ये कामगार नसल्याची नोंद आहे. अकोल्याचे कामगार अधिकारी प्रशांत महल्ले यांच्याकडे वाशिम व बुलडाणा जिल्हय़ाचा प्रभार आहे. दुकान व संस्था अधिनियम कार्यालय निरीक्षक आत्माराम धनकर व कारकून खान यांच्यावर कार्यालयाची भिस्त आहे.
६५ टक्के कामगार अशिक्षितच!
By admin | Published: September 16, 2014 6:46 PM