वाशिम : रिसोड तालुक्यातील तीन हजार लोकसंख्येच्या गोवर्धना गावात गत चार दिवसांत जवळपास ६५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने गावकरी भयभीत तर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून, परगावातून गोवर्धना येथे जाण्यास तसेच गोवर्धना येथून बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला.
गोवर्धना येथे अलिकडच्या काळात कोरोनाचा स्फोट झाल्याने गावातील शाळा गृहविलगीकरण म्हणून उपयोगात आणण्यात आली. १४ एप्रिल रोजी २१०, १६ एप्रिल रोजी २०७, १७ एप्रिल रोजी ११५ असे रुग्ण आढळून आले.यापूर्वी तेथे १२० रुग्ण सक्रिय होते. आता रुग्णसंख्या ६५० वर गेली असून, नागरिक भयभीत तर प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वाशिम व सवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले असून, सौम्य लक्षणे असलेल्या काही रुग्णांना गावातील शाळेतच गृहविलगीकरणात ठेवण्यात आले.