कोरोना विषाणू संसर्गाने जगभरात थैमान घातले. त्याची झळ महाराष्ट्रालाही मोठ्या प्रमाणात बसली. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने तातडीची पावले उचलत २३ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ लावला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आल्याने परराज्य व अन्य जिल्ह्यांत अडकलेल्या शेकडो मजुरांनी कोरोनाच्या भीतीपोटी पायदळ प्रवासाचा मार्ग स्वीकारून शेकडो किलोमीटरचा पल्ला गाठला व गाव जवळ केले. प्राप्त माहितीनुसार, ‘लॉकडाऊन’च्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले. तसेच २४ मार्च ते २५ मे २०२० या ‘लॉकडाऊन’च्या दोन महिन्यांच्या कालावधीत ३५ हजार ६०८ मजूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले.
------
विदेशातून परतले १४२ व्यक्ती
गतवर्षी कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढू लागताच जगभरात भीतीचे वातावरण पसरले. विविध देशांतून इतर देशांत नोकरी, व्यवसायांसाठी स्थलांतरित लोकांनी मायदेशाची वाट धरली. त्यात भारतातून इतर देशात स्थलांतरित झालेल्या एकूण लोकांपैकी लॉकडाऊन काळातच हजारो लोक मायदेशी परतले. त्यात वाशिम जिल्ह्यातील १४२ लोकांचा समावेश होता.
-------------------
परराज्यातील ५१७१ कामगारांना पाठविले घरी
कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर शासनाने लॉकडाऊन जारी केले. त्यामुळे रोजगारासाठी वाशिम जिल्ह्यात दाखल झालेले हजारो कामगार अडकून पडले. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने या कामगारांचा शोध घेऊन त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली, तर यातील ५१७१ कामगारांना घरी पोहोचण्यासाठी त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यात आले.