लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १०७६ पैकी १२२ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नसून, आता निधी उपलब्ध होत असल्याने ६७ अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्न निकाली निघणार आहे. दुसरीकडे ४९ इमारतींचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोणातूनही नियोजन केले आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात १०७६ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच महिला, लहान मुले व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे, पोषण आहार पुरविण्याचे कामही केले जाते. दुसरीकडे १०७६ पैकी १२२ अंगणवाड्यांना अद्यापही स्वतंत्र इमारत नसल्याने बालकांसह महिला लाभार्थी व कर्मचाऱ्यांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते.१२२ पैकी ४९ अंगणवाड्यांचे बांधकाम अद्यापही पूर्णत्वाकडे आली नसल्याने या अंगणवाड्यांचा कारभारदेखील भाड्याच्या इमारतीतूनच सुरू आहे. अपूरा निधी तसेच संबंधित कंत्राटदाराची दिरंगाई यामुळे ४९ अंगणवाड्यांचे बांधकाम पुर्णत्वाकडे आले नाही. उर्वरीत ७३ इमारतींच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरीता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा नियोजन विकास समिती तसेच शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. सन २०१८-१९ या वर्षात ६ अंगणवाड्यांसाठी निधी मिळाल्याने बांधकामे सुरू आहेत तर उर्वरीत ६७ अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा नियोजन विकास समिती तसेच शासनाकडे निधी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मिळाला असून, यामधून १९ नवीन अंगणवाडी बांधकाम व दुरूस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. वाशिम हा आकांक्षित जिल्हा असल्याने आयुक्तालयाकडून (मुंबई) अंगणवाडी श्रेणी वर्धन व देखभाल दुरुस्तीकरीता १ कोटी १० लाखाचा निधी मिळाला असून, यामधून अंगणवाडी बांधकाम व दुरूस्ती प्रस्तावित केली जाणार आहे. हा निधी केवळ नंदुरबार व वाशिम जिल्ह्यासाठीच मिळाला आहे. याव्यतिरिक्त सन २०१९-२० या वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून ‘व्हाईट बुक’नुसार २ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने २७ अंगणवाड्यांचे बांधकाम महिला व बालकल्याण विभागाने प्रस्तावित केले होते. मात्र, या निधीत शुक्रवार, १२ जुलै रोजी ऐनवेळी बदल करण्यात आला असून, आता मानव विकास निधीमधून ४८ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी निधी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने १२ जुलै रोजी महिला व बालकल्याण विभागाने एकूण ४८ अंगणवाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर केला.जिल्हा नियोजन समितीऐवजी आता मानव विकास मिशनमधून मिळणार निधीजिल्ह्यातील इमारत नसलेल्या अंगणवाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विविध योजनेतून निधी प्राप्त होत आहे तसेच निधी प्रस्ताव पाठविले जात आहेत. १५ दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या पार पडलेल्या सभेत सन २०१९-२० या वर्षात २.२६ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे एकूण २७ अंगणवाड्यांचे बांधकाम प्रस्तावित केले होते. मात्र, १२ जुलै रोजी अचानक चक्रे फिरली आणि जिल्हा नियोजन समितीऐवजी मानव विकास मिशनमधून ४८ अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी निधी दिला जाईल, असे वरिष्ठ स्तरावरून सांगण्यात आले. त्यानुसार १२ जुलै रोजीच ४८ अंगणवाड्यांचा प्रस्ताव मानव विकास मिशनकडे पाठविण्यात आला.
६७ अंगणवाड्यांना मिळणार स्वतंत्र इमारत; निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:56 PM