वाशिम: सोयाबीनच्या पिकात शेतमजूर तण कापण्याचे काम करीत असताना त्यांना तब्बल ७ फ़ुट लांबीचा अजगर दिसला. वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने या अजगराला पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ही घटना शनिवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारनजिकच्या येडशी येथे शनिवारी तुकाराम पाटील यांच्या शेतात सोयाबीनच्या पिकात शेतमजुरांना अजगर दिसला. ही माहिती पोलीस पाटील गणेश बारड यांनी श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा आपत्ती व्यवस्थापन पथकाला दिली. त्यावरून रासेयो समन्वयक प्रा. बापुराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पथकातील सदस्य आदित्य इंगोले, शुभम हेकड, प्रविण गावंडे, विलास नवघरे, कंझरा येथील सर्पमित्र अमोल खंडारे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोयाबीन पिकात दडून बसलेल्या ७ फुट लांबीच्या अजगरास सुरक्षीतपणे पकडले व वनविभागाला माहिती देऊन निसर्ग अधिवासात सोडले.
पिकांमध्ये सापांचा संचार, शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन
गेल्या काही दिवसांत वातावरणात बदल झाला असून, उंच वाढलेल्या पिकांत सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनाही घडत आहेत. ही बाब लक्षात घेत शेतमजुर व शेतकरी बांधवांनी शेतात कामे करीत असताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन रासेयो पथकाच्या सदस्यांनी यावेळी केले.