भामदेवी शेतशिवारात असलेल्या शेतांकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत; परंतु मोठा नाला आडवा गेल्याने अधिक पाऊस झाल्यास त्याला पूर येऊन सर्वच मार्ग बंद होतात. नाल्यावरून पुराचे पाणी वाहत असल्यास तेथून ट्रॅक्टर सुद्धा शेतात नेता येणे अशक्य होते. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी साहित्य तथा मजुरांना शेतात घेऊन जाता येत नाही. तसेच पिकलेले पीक कापून घरीदेखिल आणता येत नाही. या दुहेरी संकटामुळे ७० एकरपेक्षा अधिक शेतजमीन दरवर्षी पडिकच ठेवावी लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा स्थानिक नेत्यांकडे व्यथा मांडली; परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे.
...............
बाॅक्स :
पाच गावांतील शेतकरी हैराण
पांदण रस्त्याअभावी पडिक राहत असलेल्या शेतजमिनींमध्ये नागलवाडी, भामदेवी, धनज बु., पिंप्री मोडक आणि भिवरी या पाच गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. शेतशिवारात जाण्याकरिता चांगल्या दर्जाच्या पांदण रस्त्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी संबंधित गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकवेळा केली; मात्र त्याची दखल अद्याप कुणीच घेतलेली नाही.
..............
कोट :
भामदेवी शेतशिवारात गट क्र. ८८ मध्ये माझ्या मालकीची पाच एकर व भावाची सात एकर अशी एकूण १२ एकर जमीन आहे; मात्र पांदण रस्त्याची सोय नसल्याने विशेषत: खरीप हंगामात शेतात ये-जा करता येणे अशक्य होते. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच १२ एकर शेती पडिक ठेवावी लागत आहे. शासनाने या समस्येकडे लक्ष पुरवून पावसाळ्यापुर्वी पांदण रस्ता तयार करावा, अशी मागणी आहे.
- प्रकाश गोटूजी प्रघणे
शेतकरी, नागलवाडी