लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या सोमवार, १ जुलैपासून संपूर्ण राज्यासह वाशिम जिल्ह्यातही ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेस प्रारंभ होत आहे. त्याचे नियोजन पूर्ण झाले असून ‘आॅनलाईन’ नोंदणी झालेले ७० हजार ‘ग्रीन आर्मी’ सदस्यही वृक्षलागवडीकरिता सज्ज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, पंचायत समित्या, ग्राम पंचायती, सामाजिक वनिकरण, वनविभागासह प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक विभागास वृक्षलागवडीचे उद्दीष्ट विभागून देण्यात आले आहे. या वृक्षलागवडीकरिता सर्वच यंत्रणांनी यापुर्वीच खड्डे खोदण्याची कार्यवाही पूर्ण केली असून सामाजिक वनिकरण विभागाकडे २८ लाख ५२ हजार वृक्षांच्या रोपटे आहेत. त्यातून स्वत:ची गरज भागविण्यासोबतच ग्रामपंचायतींना रोपटे पुरविली जाणार आहेत. तसेच वनविभागाकडे १४ लाख ८१ हजार वृक्षांच्या रोपटे तयार असून स्वत:सह प्रशासकीय यंत्रणांना रोपटे पुरविली जाणार आहेत.वृक्षलागवडीकरिता पुरेशा प्रमाणात मजूरांची व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह लोकसहभागातूनही वृक्षांची लागवड केली जाणार असून आॅनलाईन नोंदणी झालेल्या ७० हजार ‘ग्रीन आर्मी’ सदस्यांनाही वृक्षलागवडीसाठी सज्ज केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात ७० हजार‘ग्रीन आर्मी’ सदस्य वृक्षलागवडीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 3:07 PM