वाशिम : खरीप हंगामाकरीता ७५ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली असून, ७० हजार ५० मेट्रीक टन खतसाठा मंजूर झाला आहे. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये, सूचनांचे पालन केल्यास कारवाइ करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाने कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे, कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्हयात येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी.
कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करु नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी. कृषी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे अन्यथा पालन न करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी कृषी विभागाला दिले.