मंगरूळपीर (वाशिम) : गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे. पाणीप्रश्नावरून पेटलेल्या या आंदोलनामुळे जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासन चांगलेच हैराण झाले असून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासाठी मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या गावातील शेतक-यांनी जमिनी संपादित करून दिल्या. मात्र, धरणातील पाण्याचा संबंधित गावातील शेतक-यांना फायदा होण्याऐवजी अन्य गावांचेच चांगभले होत आहे. निंबी या गावाला कालव्याव्दारे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. मात्र, त्यास प्रखर विरोध दर्शवून तिन्ही गावातील महिला-पुरूषांनी आपल्या गुराढोरांसह धरणावरच ठिय्या मांडला आहे.
हा निर्णय तत्काळ मागे घ्या; अन्यथा धरणातच सामूहिकरित्या जलसमाधी घेवू, असा निर्वाणीचा इशारा गावक-यांनी दिला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा पराजे, मंगरूळपीरचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्यासह अन्य अधिकारीवर्गाकडून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तो वृत्त लिहिस्तोवर यशस्वी झालेला नव्हता.