वाशिम : जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या ९२ सदस्य पदांच्या जागांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार असून, ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. पाचपैकी तीन सरपंच पदासाठी एकही अर्ज नसल्याने पदे रिक्त राहणार असून, दोन सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे. दुसरीकडे ९२ सदस्य पदापैकी ७१ ठिकाणी केवळ एकच अर्ज असल्याने अविरोध होण्यातील अडथळा दूर झाला.
३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या एकूण ९२ रिक्त सदस्यांसाठी आणि ५ रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी येत्या १८ मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत सदस्य पदासाठी १२५ उमेदवारी अर्ज तर सरपंच पदासाठी चार अर्ज दाखल झाले होते. ३ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये सदस्य पदासाठीचे १२ अर्ज अवैध ठरले. ९२ सदस्य पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज तर सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज आहेत.
७१ सदस्यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्याने ते अविरोध होण्यातील अडथळा दूर झाला. ८ मे रोजी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे.