वाशिम : गत १० ते १२ वर्षांपासून रखडलेली शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया अखेर मार्गी लागली असून, शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला पदोन्नतीचे गिफ्ट मिळाले आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या ७७ शाळांना नियमित मुख्याध्यापकही मिळाले आहेत.
जिल्ह्यात शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया हा चर्चेचा विषय बनला होता. पात्र असूनही पदोन्नती मिळत नसल्याने शिक्षकांमधून रोष व्यक्त होत होता. काही जण तर पदोन्नती मिळण्यापूर्वीच सेवानिवृत्तही झाले. पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात शिक्षक संघटनांनी लढा उभारला. यासंदर्भात ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मागील ८ ते ९ वर्षांत आश्वासनाशिवाय शिक्षकांच्या पदरी काहीही पडले नाही.
अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, शिक्षण विभागाचे अधीक्षक गजानन खुळे आदींशी सर्वच शिक्षक संघटनांनी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेला ऑगस्ट महिन्यात यश आले आणि सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिनी पदोन्नती मिळाली. ५ सप्टेंबर रोजी पदोन्नतीस पात्र शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिली.
अशी मिळाली पदोन्नती !मुख्याध्यापक ७७, विस्तार अधिकारी (वरिष्ठ) २, विस्तार अधिकारी (कनिष्ठ) १० अशा पदांवर पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळाली.