लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात ४.१५ लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून प्रमुख पिक असलेल्या सोयाबिनचा पेरा २.९६ लक्ष हेक्टरवर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी ७७ हजार ७१६ क्विंटल बियाण्याची गरज भासणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.जिल्ह्यात ४ लक्ष १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित असून त्यासाठी एकूण २ लक्ष १२ हजार ७२८ क्विंटल बियाण्याची आवश्यकता भासणार आहे. सार्वजनिक, खासगी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून २ लक्ष २१ हजार ३७४ क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध होईल. जिल्ह्याचे प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनची पेरणी २ लक्ष ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून याकरिता ७७ हजार ७१६ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ८३ हजार ३६२ क्विंटल बियाणे उपलब्ध होईल. तुरीचे ५३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून याकरिता ३ हजार ६३८ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच खरीप हंगामासाठी ५० हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी नोंदविण्यात आली असून ५६ हजार २९० मेट्रिक टन रासायनिक खताला मंजुरी मिळाली असल्याचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी ७७,७१६ क्विंटल सोयाबिन बियाण्याची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 4:38 PM