लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार, खासदार आणि सर्व प्रशासकीय विभागांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २३ ते २५ जून असे सलग तीन दिवस रात्री उशिरापर्यंत कामकाज करून नागरिकांकडून प्राप्त तब्बल ८९६ तक्रारींचे ह्यआॅन दी स्पॉटह्ण निराकरण केले. यादरम्यान, कामात हयगय करणाऱ्या ३० अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विविध स्वरूपातील कारवाईदेखील प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रारी अर्जांवर तातडीने कार्यवाही होऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक विहित कालमर्यादेत व्हावी, यासाठी स्वत: पालकमंत्री राठोड यांनी पुढाकार घेत तीनही उपविभाग स्तरावर विस्तारित समाधान शिबिरांचे आयोजन केले. विशेष म्हणजे तीनही उपविभाग स्तरावर झालेल्या या शिबिरांकरिता पालकमंत्र्यांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिबिरस्थळी ह्यतळह्ण ठोकून तक्रारदारांच्या समस्या जाणून घेतल्या. खासदार भावना गवळी, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या मान्यवरांसह जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती, नगर परिषद, जलसंपदा विभाग, महावितरण, पोलिस विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शनिवार, रविवार या सुट्यांच्या दिवशीही आपले कर्तव्य चोखपणे बजावले. विस्तारित समाधान शिबिराच्या पहिल्या दिवशी अर्थात २३ जूनला कारंजा येथील बाबासाहेब धाबेकर सभागृहात पार पडलेल्या शिबिरात कारंजा तालुक्यातील २२३ आणि मानोरा तालुक्यातून प्राप्त २२१ अशा एकंदरित ४४४ तक्रारींचा ह्यआॅन दी स्पॉटह्ण निपटारा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी २४ जूनला वाशिम येथील वाटाणे लॉन्समध्ये झालेल्या शिबिरात वाशिम, रिसोड आणि मालेगाव या तीन तालुक्यांमधून प्राप्त अनुक्रमे ९२, २१६ आणि ५८, अशा एकूण ३६६ तक्रारींचे नागरिकांसमक्ष निराकरण झाले, तर २५ जून रोजी मंगरूळपीर उपविभाग स्तरावर झालेल्या शिबिरात ८६ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्र्यांनी केले होते. त्यानुसार, आजच्या मंगरूळपिरातील शिबिरात कामात हयगय करणारे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयाचे सहायक अधीक्षक कदम यांना निलंबित करण्यात आले. यासह तलाठी खान यांच्या निलंबनाचा प्रस्ताव असून, आणखी एका तलाठ्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर झालेल्या समाधान शिबिरांमध्ये प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत मिळाली. यापुढेही उपविभागस्तरावर दर तीन महिन्याला समाधान शिबिरांचे आयोजन केले जाईल. - संजय राठोड पालकमंत्री, वाशिम जिल्हा
८९६ तक्रारींचे ‘आॅन दी स्पॉट’ निराकरण!
By admin | Published: June 26, 2017 10:13 AM