लोकमत न्युज नेटवर्क येवता बंदी (वाशिम): कारंजा तालुक्यातील ग्राम येवता बंदी येथे ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने ८ गार्ईंचा मृत्यू झाला, तर अनेक गुरांना विषबाधा झाल्याची घटना ३० मे रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच कारंजा तालुका पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी पोहोचून विषबाधा झालेल्या गुरांवर उपचार केले. त्यामुळे १२ गुरांचे प्राण वाचले. येवता बंदी येथील गुराखी नेहमीप्रमाणे गावातील लोकांची गुरे घेऊन जंगलात चराईसाठी त्यांना घेऊन गेला. गुरे दिवसभर चरल्यानंतर सायंकाळच्या वेळी शिवारातील एका शेतात कापणी केल्यानंतर ज्वारीच्या खोडव्यांवर उगवलेले कोमटे यातील काही गुरांनी खाल्ले. त्यामुळे गुरे अत्यवस्थ होत असल्याचे गुराख्याला दिसले. त्यामुळे त्याने गावाकडे धाव घेतली. गावकरी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी त्यातील ८ गार्इंचा मृत्यू झाला. त्यात येवता येथील दिपक अलाटे, पंढरीनाथ कापसे, जनार्दन पारे, रामभाऊ मोहतुरे, धनराज पुंड यांच्या मालकीच्या गार्इंचा समावेश होता. दरम्यान, विषबाधा झालेल्या इतर १२ गुरांवर पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी, पशूधन विकास अधिकारी डॉ. जटाळे, डॉ. राऊत, डॉ. लोमटे, डॉ. दिघडे, डॉ. टोपले, डॉ. सावदे यांनी रात्री ११ वाजेपर्यंत उपचार केल्याने १२ गुरांचे प्राण वाचल्याने पशूपालकांना काहिसा दिलासाही मिळाला. दरम्यान, मृत्यू झालेल्या गुरांच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी पशूपालकांनी केली आहे. नऊ दिवसांतील तिसरी घटनाकापणी केलेल्या ज्वारीच्या खोडव्यांवर उगवणारे कोमटे खाऊन गुरांचा मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. कारंजा तालुक्यातच गेल्या ९ दिवसांत असा प्रकार तीन वेळा घडला. त्यात २३ मे रोजी जांब शिवारात ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने १ म्हैस, पोहा येथे २८ मे रोजी ७ गुरे दगावली, तर ३० मे रोजी येवता बंदी येथे आणखी ९ गुरे दगावल्याने पशूपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने ८ गार्ईंचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 4:25 PM