संतोष वानखडे
वाशिम : संमतीपत्र प्राप्त झालेल्या ८१ शाळा या आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झाल्या असून, अद्याप १९३ शाळांसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाचव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती ३.१९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळेचे वर्ग बंदच आहेत. गतवर्षी दोन महिन्यांसाठी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते, परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वर्ग परत बंद झाले. यंदाही विद्यार्थ्यांसाठी २८ जून रोजी शाळेची घंटा वाजलीच नाही. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समिती व पालकांची संमती मिळाल्यानंतर, कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या. जिल्ह्यात ४२०च्या जवळपास ग्रामपंचायती कोरोनामुक्त आहेत. शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समितीचा ठराव आणि विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या २७५ शाळा असून, यामध्ये ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे. शिक्षकांची एकूण संख्या २,९०६ आहे. जिल्ह्यात पहिल्या दिवशी अर्थात, १५ जुलै रोजी ७३ शाळा उघडल्या, तर १,८०२ विद्यार्थी उपस्थित होते. पाचव्या दिवशी अर्थात, २० जुलै रोजी ८१ शाळा सुरू झाल्या असून, २,२६१ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. अल्प विद्यार्थी संख्येवरून पालकांच्या मनात अद्याप कोरोनाची धास्ती असल्याचे दिसून येत आहे.
००००००००००००
वाशिम, मानोरा तालुक्यात विद्यार्थी उपस्थिती नगण्य!
जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत ७५ हजार ७६० विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील ८,१३३, मालेगाव १२,५४६, मंगरुळपीर ८,२४५, मानोरा ११,३१३, रिसोड १९,०९० आणि वाशिम तालुक्यातील १६,४३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पाचव्या दिवसापर्यंत विद्यार्थी उपस्थिती ३.१९ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. एकूण २,२६१ विद्यार्थी शाळेत हजर असल्याने, विद्यार्थी उपस्थिती अल्प असल्याचे दिसून येते. सर्वात कमी उपस्थिती वाशिम व मानोरा तालुक्यातील शाळांमध्ये प्रत्येकी १७३ आहे. सर्वात जास्त विद्यार्थी उपस्थिती मालेगाव तालुक्यातील २२ शाळांमध्ये ९४९ आहे.
००००००००
२९ टक्के शाळा सुरू!
जिल्ह्यात ग्रामीण भागात २७५ शाळा असून, आतापर्यंत ८१ शाळा सुरू झाल्या असून, याची टक्केवारी २९.८ अशी येते. उर्वरित शाळांसाठी स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समितीचा ठराव अद्याप मिळाला नाही. कोरोना परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन व ग्रामस्तर समिती ठराव देते. १९४ शाळा सुरू करण्याबाबत ठराव न आल्यामुळे या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. शाळा सुरू करण्यासाठी ठराव केव्हा मिळणार, याकडे शिक्षण विभागासह विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून आहे.
०००००००
०००००
सुरू झालेल्या शाळा व उपस्थित विद्यार्थी
तालुकाशाळाविद्यार्थी
कारंजा ३० ३१४
मालेगाव २२ ९४९
मं.पीर ०७ २५३
मानोरा ०५ १७३
रिसोड १२ ३९९
वाशिम ०५ १७३
०००००००००००००००
पहिल्या दिवशी सुरू झालेल्या शाळा ७३
पाचव्या दिवशी सुरू झालेल्या शाळा ८१
पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती १,८०२
पाचव्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती २,२६१
पहिल्या दिवशी शिक्षक उपस्थिती १,०१६
पाचव्या दिवशी शिक्षक उपस्थिती १,१६७