वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कार्यरत असलेल्या मजुरांचे आधारकार्ड लिंकींग प्रक्रिया जिल्ह्यात सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. मजुरांचे वेतन देण्यात होणारी अनियमितता तथा कामातील पारदर्शकतेला प्राधान्य देऊन मजुरांचा डाटाबेस तयार करण्याच्या दृष्टीने ही मोहिम महत्त्वपूर्ण आहे. येत्या काळात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेल्या मजुरांच्या खात्याशी आधारचे लिंकअप करून मजुरांचे मानधन देण्यात सुसुत्रता आणण्याची ही मोहिम आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील सलग तीन वर्षे मनरेगावर काम करणार्या १00 टक्के मजुरांचे आधारलिंक करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंंंत ८२.२३ टक्के मजुरांचे आधारकार्डचे लिंकअप करण्यात आले आहे. साधारणपणे मजुरांचे वेतन थेट बँक खात्यात होत असले तरी अनेकदा मजुरांचे खाते वेगवेगळ्य़ा बँकामध्ये असते. जाँबकार्डचीही समस्या असते. अशा परिस्थितीत आधारकार्डशी सलग्न डाटाबेस तयार केल्यास मजुरांच्या एकाच खात्यात ते कोठेही काम करत असले तरी त्यांची मजुरी जमा करणे सोपे होणार आहे. सोबतच देशात जनधन योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या संपूर्ण वित्तीय समावेशनाच्या दिशेने जाण्याच्या दृष्टीनेही ही मोहीम महत्त्वपूर्ण म्हणावी लागले.वाशिम जिल्ह्यात ८८ हजार ९९ मजुरांनी मनरेगातंर्गत काम केल्याच्या नोंदी आहेत. दोन आर्थिक वर्षे आणि चालू आर्थिकवर्षात एखाद दिवसही काम केले असले अशा मजुरांचे हे आधारलिंक अप सुरू आहे. या मजुरांपैकी ७२ हजार ४४२ मजुरांनी आधारकार्ड काढलेले असून त्यांच्यापैकी ३७ हजार ५४९ मजुरांची मनरेगा यंत्रणेने खातरजमा केली आहे. तर मनरेगातंर्गतच्या कामावर काम करणार्या मजुरांपैकी १५ हजार ६५७ मजुरांनी २७ जुलैपर्यंंंत आधारकार्ड काढलेले नव्हते. त्यामुळे या मजुरांचे आधारकार्ड काढण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील मजुरांचे ८७ टक्के आधारलिंकअप झाले आहे.
मनरेगावरील ८२ टक्के मजुरांचे आधारलिंक
By admin | Published: August 03, 2015 12:50 AM