वाशीम : शाळासिद्धी कार्यक्रमाच्या स्वमुल्यांकनात जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची मोठी पिछेहाट झाली आहे. जिल्ह्यातील ८५३ शाळांना 'ब', तर ९८ शाळांना 'क' श्रेणीत टाकण्यात आले आहे, तर केवळ ३१९ म्हणजेच २३.२५ टक्के शाळांनाच 'अ' श्रेणी मिळविता आली आहे. न्यूपा या दिल्ली स्थित संस्थेने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. .
बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज लक्षात घेता शालेय स्तरावरची शिक्षणाची मानके सुधारण्यासाठी शाळासिध्दी हा राष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील न्यूपा संस्थेतर्फे देशभरातील शाळांचे मूल्यांकन सुरु झाले. महाराष्ट्रातील एकूण १ लाख ९ हजार ९८ शाळा यात सहभागी झाल्या. या शाळांच्या मूल्यांकनाची आकडेवारी नुकतीच न्यूपाने जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील ३४ हजार ४९१ शाळांनी 'अ' श्रेणी मिळविली आहे. ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ३१९ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८५३ शाळांना 'ब', तर ९८ शाळांना 'क' श्रेणीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील संपूर्ण शाळा ह्या 'डेंजर झोन' मध्ये आल्याने येथील शिक्षकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. शिक्षणाच्या नावावर पालकांकडून गलेलठ्ठ पैसे उगळणाऱ्या शैक्षणिक संस्था तथा 'डिजिटल' वर्ग खोल्यांचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक प्रगतीमध्ये सपशेल नापास ठरल्याचे शाळा सिध्दी मूल्यांकनावरुन स्पष्ट होत आहे.