- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील एकंदरित ८५४ शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी फेब्रूवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेली शिष्यवृत्तीचीपरीक्षा दिली; मात्र त्यापैकी केवळ ३४६ विद्यार्थीच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकले. यावरून जिल्ह्यातील शिक्षणाचा स्तर खालावल्याचे निदर्शनास येत असून पुर्व उच्च प्राथमिक आणि पुर्व माध्यमिक शाळांनी यावर मंथन करण्याची वेळ खºयाअर्थाने ओढवली आहे. पुर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पुर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात वाशिम जिल्ह्यातील ११२१ विद्यार्थी यशस्वी झाले; तर केवळ ३४६ विद्यार्थी शासनाकडून मिळणाºया शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुल्या स्वरूपात गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यातील तरतूदी लक्षात घेवून राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्तीचा स्तर इयत्ता चौथीऐवजी पाचवी आणि इयत्ता सातवीऐवजी आठवी असा करण्यात आला. त्यानुसार, सन २०१६-१७ पासून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये नियमितपणे केले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या फेब्रूवारी २०१८ मधील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात इयत्ता पाचवीमधून जिल्ह्यातील ५६९ शाळांमधून ५०८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १९८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली. तसेच इयत्ता आठवीमधून जिल्ह्यातील २८५ शाळांमधून ४७४७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. त्यापैकी २८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर १४८ विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता पात्र ठरले आहेत.
परीक्षेला बसले ९८३१ विद्यार्थी; शिष्यवृत्तीस पात्र ठरले जेमतेम ३४६!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 3:27 PM