यावेळी पालकमंत्री शंभराजे देसाई, आमदार अमित झनक, किरणराव सरनाईक, जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक उपस्थित होते. खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही. लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता नेहमी सहकार्य केले आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ अकोला ते वारंगा या महामार्गाच्या चौपदरीकरणकरीता लागणारी जमीन संपादित करण्याकरीता आपण जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व शेतकरी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन शंभर टक्के जमीन संपादित करून घेतल्यामुळेच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर सायखेडा (ता. वाशीम) येथील निर्माणाधीन पूल पडल्यानंतर रात्रीतून मलबा हटवून निकृष्ट काम करत असलेल्या कंत्राटदाराच्या चुका राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास शिवसैनिकांनी आणून दिल्या तसेच १६१ मंगरूळपीर पिंजर या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून या रस्त्याला तडा गेलेले आहेत. तडा गेलेल्या रस्त्यांना कंत्राटदाराने स्टॅपल केले. याप्रमाणे इतरही रस्ते व पुलाचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले. जिल्ह्यात कुठेही राष्ट्रीय महामार्गाचे काम शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडून बंद पाडण्यात आलेले नाही. राजकीय हेतूने प्रेरीत होऊन नामदार नितीन गडकरी यांच्याकडे तक्रारी केलेल्या असाव्यात, असेही गवळी म्हणाल्या.
००००००
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातुन जाणाऱ्या महामार्गाबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांबद्दल जी नाराजी व्यक्त केली आहे तसा कुठलाही प्रकार घडलेला नाही. पालकमंत्री या नात्याने कोणत्याही कंत्राटदाराने अथवा संबंधितांनी अद्यापपर्यंत आपणास तशी तक्रार दिली नाही तसेच कळविलेलेसुद्धा नाही. याप्रकरणी आपण चौकशी करून तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करू.
शंभूराजे देसाई
गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम