पर्यावरणाचा झपाटून होणारा ऱ्हास रोखणे, वायू प्रदूषणाची दाहकता कमी करणे व पावसाचे बिघडलेले तापमान ताळ्यावर आणणे यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे प्रत्येकाच्या ध्यानात आले आहे. म्हणूनच शासनाने शतकोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी या योजनेतून कोट्यवधी वृक्षांची लागवड विविध विभागांमार्फत विविध ठिकाणी केली जाते. सामाजिक वनीकरण विभागातर्फे ठिकठिकाणी रोपवाटिकांची निर्मिती करून त्यामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या लाखो रोपे तयार केली जात आहेत. वृक्षलागवडीला सामाजिक उपक्रमाचे स्वरूप देऊन शासनातर्फे विविध सामाजिक संघटना, संस्था शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जात आहे. जवळच्या रोपवाटिकेतील उद्दिष्टाएवढी रोपे घेऊन त्याची लागवड व संवर्धन करण्याची जबाबदारी संस्था कार्यालयावर टाकली जात आहे. त्यामुळे संस्था, कार्यालये, शैक्षणिक संस्था दरवर्षी पावसाळ्यात दिलेल्या उद्दिष्टाएवढे रोपट्यांचे रोपण करतात. मात्र, त्याचे संवर्धन करण्याची मनापासून तयारी कोणीही करीत नाही. संबंधित विभागप्रमुखांनी वृक्षलागवडीचा व जिवंत झाडांचा अहवाल मागितला की कागदोपत्री सर्व आलबेल अहवाल पाठविला जातो.
............
वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज
वाशिम ते मालेगाव रोडवर नवीन रस्ता झाल्याने अनेक वृक्ष तोडले आहेत; परंतु मालेगाव, वाशिमला दररोज जाणारे अनेक लोक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन वाशिम-मालेगाव रोडवर वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज बोलली जात आहे.
........
पाणीटंचाई वृक्षसंवर्धनाच्या पथ्थ्यावर
पाण्याची तीव्र टंचाईसुद्धा वृक्षसंवर्धनाच्या पथ्यावर पडत आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. घरच्या दुभत्या जनावरांना पाणी कोठून मिळवावे, याची सतत चिंता पशुपालकांना सतावत आहे. घरातील परसबागेतील, कुंडीतील रोपटे पाण्याअभावी कोमेजत आहेत, तर मग वृक्षलागवड केलेल्या कोट्यवधी रोपट्यांना पाणी कोठून देणार, मोकाट जनावरांपासून रोपट्यांचे संरक्षण कसे करणार, याचे नियोजन कोणाजवळही तयार नसते.