लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गत काही वर्षात मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे दिसून येते. सन २०१५-१६ दर हजार मुलांमागे असलेल्या ९०३ मुलींची संख्या सन २०१९-२० वर्षात ९२० वर गेली आहे. घराच्या उंबरठ्यापलीकडे विश्व नसलेली बाई आपले घर सावरायला बाहेर पडली, बघता बघता तिने तिथेही प्रगती केली. आजमितीला तर मुलींनी प्रगती केली नाही असे एकही क्षेत्र उरले नाही. पालकांना, कुटुंबीयांना याचा यथोचित अभिमानही असतो. तरीही आईच्या पोटातला गर्भ मुलीचा आहे हे कळल्यावर तो नष्ट करण्यासाठी राज्यात सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात प्रयत्न होतात. यावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदे अमलात आणत विविध उपक्रम हाती घेतले. स्त्री भ्रूणहत्या टाळा, मुलीचा जन्मदर वाढविण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानात जिल्ह्याचा समावेश आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणे सुरू आहे. याबरोबरच आरोग्य व जिल्हा प्रशासनातर्फेदेखील जनजागृती करण्यात आले आहे. याचे चांगले परिणाम दिसून येत असून, २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये हजार मुलांमागे १७ मुलींची संख्या वाढली आहे.एकीकडे महिलांवरील अन्याय वाढत आहेत तर दुसरीकडे कन्या जन्मांची संख्याही वाढत असल्याचे जिल्ह्यात समाधानकारक चित्र आहे. २०११ पर्यंतचे लिंगगुणोत्तराचे आकडे पाहिले तर जिल्हा डेंजर झोनमध्ये होता, हे प्रकर्षाने जाणवते. २०११ मध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण दर हजार मुलांमागे ८९० असे होते. २०११ नंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जनजागृतीमुळे स्त्री-पुरुषांचे लिंगगुणोत्तर वाढत आहे. तथापि, अद्यापही लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील तफावत समाधानकारकपणे कमी झाली नाही
सन २०१९-२० मध्ये दर हजार मुलांमागे जिल्ह्यात ९२० मुली आहेत. चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत हेच प्रमाण ९४३ वर पोहोचले आहे. लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील तफावत दूर करून स्त्री जन्मदर वाढविण्यासंदर्भात जिल्ह्यात जनजागृती करण्यात येते.- डाॅ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम