लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना जुलै महिना अर्धा उलटला तरी, केवळ १९.३३ टक्केच पाऊस पडला आहे. त्यात १३१ धरणांपैकी निम्म्या धरणांत शुन्य टक्केही उपयुक्त जलसाठा झाला नसून, त्यातील १८ धरणे कोरडीच आहेत, तर ९५ प्रकल्पात मृतसाठाच आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अद्यापही १५७ गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. पावसाच्या सरासरीत वाढ न झाल्यास यंदा हिवाळ्यापासूनच जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान वार्षिक सरासरी ७९८.७० मि. मी. पावसाची नोंद होते. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील ३२१ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता यंदा मान्सूनला विलंब झाल्याने पावसाच्या सरासरीवर मोठा परिणाम झाला. जिल्ह्यात १ जुन ते १० जुलैदरम्यान २४७.१८ मि. मी. अपेक्षीत असताना गतवर्षी याच कालावधित ३२५.५५ मि. मी. पाऊस पडला, तर यंदा याच कालावधित १५८.४३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात मि. मी. चा विचार करता यंदा ८९ मि. मी. पावसाची तुट सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. यामुळेच जिल्ह्यातील १८ प्रकल्प अद्याप पूर्णपणे कोरडेच आहेत, तर तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पासह ७७ प्रकल्पांत मृतसाठाच आहे. गतवर्षी अर्ध्या हिवाळ्यानंतर जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू लागली होती. अगदी जुन महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाभरात ६४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता, तर ३८२ विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला यातील २७ टँकर बंद झाले, तर २३७ अधिग्रहित विहिरी बंद करण्यात आल्या. तथापि, अद्यापही ३७ गावांना ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, १४५ अधिग्रहित विहिरीतून ११९ गावांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम तालुक्याची स्थिती समाधानकारकजिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांच्या तुलनेत यंदा वाशिम तालुक्यातील पावसाची सरासरी अधिक आहे. तालुक्यात १ जुन ते १० जुलैदरम्यान २२,६३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी थोडी सुधारल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांत सुरू केलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कारंजा तालुक्यात किती उपाय योजनांना मुदतवाढ दिली. त्याचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
वाशिम जिल्ह्यातील ९५ प्रकल्प तहानलेलेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 3:36 PM
१३१ धरणांपैकी निम्म्या धरणांत शुन्य टक्केही उपयुक्त जलसाठा झाला नसून, त्यातील १८ धरणे कोरडीच आहेत, तर ९५ प्रकल्पात मृतसाठाच आहे.
ठळक मुद्दे मि. मी. चा विचार करता यंदा ८९ मि. मी. पावसाची तुट सद्यस्थितीत निर्माण झाली आहे.१८ प्रकल्प अद्याप पूर्णपणे कोरडेच आहेत, तर तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पासह ७७ प्रकल्पांत मृतसाठाच आहे.जुन महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाभरात ६४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.