नंदिकशाेर नारे, वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील चिंचखेडा कासोळा रोडवरील पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कासोळा येथील एका २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला .
कासोळा गावात राहणारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण ही युवती १६ जुलै रोजी तिच्या वडिलांसोबत वाशिम तालुक्यातील देवगाव गावात मामाच्या घरी जेवणासाठी गेली होती. सायंकाळी घरी परतत असताना, वडील व मुलगी दोघेही दुचाकीवरून घराकडे जात असताना, चिंचखेडा ते कासोळा या दरम्यानचा छोटा पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. दुचाकी थांबली आणि पुरात पडली व हे दोघेही वाहून गेले . मात्र या घटनेत वडिलांनी झाडाला धरल्याने त्यांचा जीव वाचला. दोन किलोमीटरच्या पुढे पाण्याचा प्रवाह संपला. अपघात झाला तेव्हा जाेरदार पाऊस पडत होता. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने वडील सुरेश चव्हाण यांनी आपल्या मुलीचा नदीकाठी शोध घेतला, मात्र कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी चिंचखेडा गाठून गावकऱ्यांना माहिती दिली. यानंतर येथे शेकडो लोक जमा झाले. नांदगाव येथे तीन तास शोध घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्या युवतीला वाशिम रुग्णालयात नेली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले . बुधवार, १७ जुलै रोजी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मुलीच्या मृत्यूमुळे परिसरासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.