सुनील काकडे, वाशिम: येथील जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याने त्याच्याच कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेने वाशिम पोलिसांत १४ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. त्यात विविध स्वरूपातील गंभीर आरोप करण्यात आले असून संबंधित सहायक आयुक्तावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, २६ ऑक्टोबरला शहर पोलिसांनी आरोपीचे बयान घेतले आहे. साक्षी तपासल्यानंतर न्यायालयात चार्जशिट दाखल केली जाईल, अशी माहिती ठाणेदार गजानन धंदर यांनी २७ ऑक्टोबर रोजी दिली.
यासंदर्भातील तक्रारीत पिडीत महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे की, त्या २०१४ मध्ये शासकीय सेवेत रुजू झाल्या. २०२१ पासून वाशिमच्या कार्यालयात त्यांनी कामकाज सुरू केले. यादरम्यान जुलै २०२३ मध्ये सहायक आयुक्त म्हणून प्रफुल्ल शेळके हा रुजू झाला. तेव्हापासूनच तो माझ्यावर पाळत ठेवून आहे. काहीच काम नसतानाही वारंवार स्वत:च्या केबीनमध्ये बोलावणे, टक लावून पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करणे आणि द्विअर्थाने संभाषण करणे त्याने सातत्याने सुरू ठेवले. आपण त्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले; पण त्याच्या वागणूकीत कुठलाच फरक पडला नाही. याऊलट मी प्रतिसाद न दिल्याने लहानसहान कारणांवरून नोटीस देऊन त्रास देणे सुरू केले. वरिष्ठांसोबत माझ्याबाबत व्हाटस्ॲपवर खालच्या भाषेत ‘चाटींग’ केली. अशाप्रकारे माझा शारिरीक व मानसिक छळ करणे त्याने अवलंबिले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ३५४ ‘ड’ नुसार गुन्हा दाखल केला.
‘सीसी’द्वारे पिडीतेवर ठेवायचा नजर
सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याने आपण काम करित असलेल्या ऑफीसमध्ये हेतुपुरस्सर ‘सीसी कॅमेरा’ लावला. त्याचा ‘ॲक्सेस’ त्याने स्वत:च्या केबीनमध्ये ठेवला. याद्वारे तो सतत माझ्यावर नजर ठेवत होता, असा गंभीर आरोप पिडीत महिला अधिकाऱ्याने तक्रारीत केला आहे.
गुन्हा सिद्ध झाल्यास जावे लागणार कारागृहात
या प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल शेळके याने २६ ऑक्टोबर रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशन गाठून बयान नोंदविले आहे. कार्यालयीन अन्य कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले जाणार आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ ते ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते, अशी माहिती वाशिमचे ठाणेदार गजानन धंदर यांनी दिली.