वाशिम : सततची नापीकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या एका शेतकऱ्याने १७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. संदीप नारायण राठोड (४०) रा. गव्हा (ता.मानोरा) असे मृतकाचे नाव आहे.
गव्हा येथील संदीप नारायण राठोड या शेतकऱ्याने आई व वडील यांचे नावावर असलेल्या साडेतीन एकरावर ४५ हजार रुपयाचे बँकेचे कर्ज घेतले. सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नसल्याने बँकेचे कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. त्यात घर खर्च चालविण्यासाठी खासगी सावकाराकडूनही पैसे घेतलेले होते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.
खासगी सावकाराकडून व बँकेकडून पैसे भरण्यासाठी तगादा सुरू झाला आणि इकडे सततच्या नापिकीमुळे हाती पैसा येत नसल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? याची चिंता सतावत होती. यातूनच शेवटी संदीप राठोड यांनी संजय देशमुख यांचे शेतात विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.
१७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजतादरम्यान संदीप राठोड यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतकाचे काका भीमराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनात बीट जमादार जावेद करीत आहेत.