वाशिम : स्थानिक महात्मा फुले भाजी मार्केटमधील एका दुकानाला ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ दाखल होत युद्धस्तरावर मदतकार्य केल्याने आगीवर नियंत्रण मिळून सुदैवाने कुठलीही जिवित किंवा विशेष वित्तहानी झाली नाही.वाशिम येथील पाटणी चाैकाला लागून भाजी मार्केट वसलेले आहे. तेथील काही व्यावसायिकांनी मार्केटमधील दुकाने भाड्याने घेतली आहेत. ते तिथे शिल्लक राहिलेला भाजीपाला, कॅरेट्स यासह अन्य साहित्य ठेवून देतात. अशात हरीश भानुदास पडघान यांच्या दुकानाला ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे लिडींग फायरमन साईनाथ दिनकर सुरोशे, वाहन चालक रवि सुरोशे, फायरमन धीरज संतोष काकडे आणि अजय गजानन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेवून युद्धस्तरावर मदतकार्य आरंभिले. पुढील काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
भाजी मार्केटमध्ये लागली आग; सुदैवाने जिवितहानी टळली; अग्निशमन दलाकडून युद्धस्तरावर मदतकार्य
By सुनील काकडे | Published: November 03, 2023 2:50 PM