वाशिम : जिल्हाभरात १९ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरूवार, २८ सप्टेंबर रोजी ‘श्रीं’च्या मूर्ति विसर्जनाने झाली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणूकीत ढोल-ताशे आणि डी.जे.च्या तालावर तरूणाई मनसोक्त थिरकल्याचे दिसून आले. दानशूरांकडून गणेशभक्तांना ठिकठिकाणी प्रसादाचे वितरण करण्यात आले. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष.
वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चाैकातून गणेश विसर्जन मिरवणूकीस गुरूवारी सकाळी मानाच्या गणपतीची विधीवत पुजा-अर्चा करून थाटात प्रारंभ झाला. राजकीय क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पण करण्यासह मानाच्या गणेशमुर्तिचे पुजन केले. त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी जिल्हा पोलिस दलाने चोख बंदोबस्त तैनात ठेवल्याचे पाहावयास मिळाले.पहिल्या टप्प्याची विसर्जन प्रक्रिया पूर्ण
जिल्ह्यात यंदा ७४८ गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. त्यामध्ये शहरी भागातील ३०९; तर ग्रामीण भागातील ४३९ श्री गणेश मंडळांचा समावेश आहे. २१४ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ ही संकल्पना प्रत्यक्ष साकार झाली. तीन टप्प्यांमध्ये ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून २८ सप्टेंबरला ४१५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन प्रक्रिया पूर्ण झाली. २९ सप्टेंबरला २२० मंडळांनी प्रक्रियेत सहभाग नोंदविला; तर ३० सप्टेंबरला उर्वरित ९० सार्वजनिक गणेश मंडळे मिरवणुका काढून ‘श्रीं’चे थाटात विसर्जन करणार आहेत.