वाशिम : शासकीय वाहनाने एका प्रवासी ऑटोला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात १० जण जखमी झाल्याची घटना १५ जानेवारीला सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान कारंजा मंगरूळपीर मार्गावरील मारुती सुझुकी शोरूम कारंजासमोर घडली. अपघातग्रस्त शासकीय वाहन हे कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघातस्थळा लगतच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याकरिता एम.एच. ३७ जी. ४५४६ क्रमांकाचा ऑटाे आठ प्रवासी घेऊन जात असताना कारंजाहून मंगरूळपीरकडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एम. एच . ३७ ए .डी .६४३६ क्रमांकाच्या महाराष्ट्र शासन लिहिले असलेल्या शासकीय वाहनाने प्रवासी ऑटोला जोरदार धडक दिली. त्यामुळे प्रवासी ऑटोच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि या अपघातात १० जण गंभीर जखमी झाले .
कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय वाहनाने सहाय्यक अभियंता सतीश चव्हाण व चालक पंकज जाधव हे मंगरूळपीर मार्गे पोहरादेवीला शासकीय कामाकरिता जात असताना हा अपघात घडला. प्रवासी ऑटोतील ८ प्रवासी देखील जखमी झाले. मिराबाई सुखदेव चव्हाण, विनय सिद्धार्थ सोनोने ,पूनम महादेव भगत ,अब्दुल सलीम अब्दुल करीम, शेख मोहम्मद शेख अहमद, मनोहर मुरलीधर लांडे ,प्रीतम लक्ष्मण सोनोने ,मंदा विष्णू ढोंगळे ,सतीश चव्हाण व पंकज जाधव अशी जखमींची नावे आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक रमेश देशमुख, नितीन पाटील व दीपक सोनोने यानी जखमींना उपचाराकरिता कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे जाण्याचा सल्ला उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. दरम्यान कारंजा शहर पोलिसांनी या अपघाताच्या घटनेची नोंद घेतली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहे.