वाशिम : ‘ट्रेडींग’च्या भुलभुलय्यात, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात जिल्ह्यात अनेकजण आयुष्यभराची कमाई गमावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जानेवारी ते २० मे २०२४ या कालावधीत जिल्ह्यात २७३ प्रकरणांत १ कोटी ९७ लाख ७५ हजार ५६ रुपयांची फसवणूक झाली असून, १८ लाख ९० हजार ३७६ रुपयाची रक्कम बॅंकेत होल्ड करण्यात आली.
अलिकडच्या काळात सायबर चोरट्यांकडून गुंतवणूकदारांना विविध प्रलोभन, आमिष दाखवून ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याच्या प्रकरणांत वाढ होत आहे. इतरांची फसवणूक झालेली प्रकरणे उजेडात आल्यानंतरही अनेकांना झटपट श्रीमंत होण्याचा मोह आवरत नसल्याचे, दिवसागणित उघडकीस येणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवरून अधोरेखित होत आहे. वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यातही ट्रेडींगच्या भुलभुलय्यात, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण फसवणुकीच्या जाळ्यात अलगद अडकत असल्याचे सायबर पोलिस स्टेशनच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
फसवणुकीसाठी सायबर चोरट्यांनी बनावट व्हाट्सॲप किंवा टेलिग्रामवर ग्रूप तयार केले असून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी दिवसांत पैसे दुप्पट, तिप्पट, चौपट करण्याचे आमिष देवून विविध बॅंक खात्यावर पैसे टाकण्यास सांगितले जाते. नंतर ही रक्कम सायबर चोरट्यांकडून अन्य खात्यावर वळती करून फसवणूक केली जाते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही जण पोलिस स्टेशन, सायबर पोलिस स्टेशनला तक्रार देतात तर काही जण बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्याचेही टाळतात. वाशिम जिल्हा सायबर पोलिस स्टेशनला मागील पाच महिन्यांत ऑनलाईन फसवणुकीच्या २७३ घटनांची नोंद आहे. तब्बल १ कोटी ९७ लाख ७५ हजारांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस दलाने केले.