वाशिम : जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील शिरपुर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मंदिरात असामाजिक तत्वांकडून हाेत असलेली दडपशाही बंद करण्यासंदर्भात सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येत आलेले सकल दिगंबर जैन समाजाचे बंधू भगिनी सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील शिरपूर जैन नगरीत जैन धर्माचे २३ वें तीर्थंकर श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर असून ते संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल ४२ वर्षानंतर सन २०२३ मध्ये या मंदिराचे द्वार उघडले गेले आहेत. मात्र दोन पंथाच्या आपसी वादामुळे याठिकाणी कोणत्या न कोणत्या कारणावरून मारहाणीच्या घटना घडत आहे. अशातच काही असामाजिक तत्वांकडून दडपशाही केली जात आहे व पोलिस प्रशासन मंदिर कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी वारंवार दबाव निर्माण करत असल्याचा आरोप करीत दिगंबर जैन समाजाच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवदेन देण्यात आले.
मोर्चाच्या प्रारंभी स्थानिक श्री बालासाहेब मंदिरासमोरील श्री चन्द्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे दिगंबर जैन मुनी श्री सिद्धांतसागर महाराज यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली. ब्रम्हचारी तात्या नेजकर, राजा भैय्या पवार तथा अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.निवेदन देतेवेळी बा.ब्र. तात्या भैय्या, संजय जैन, धनंजय राेकडे, आकाश महाजन, आशिष डहाळे, रितेश महाजन, आनंद गडेकर, संताेष राेकडे, सुधिर भुरे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती हाेती.