काजळेश्वर (वाशिम): जिल्ह्यातील काजळेश्वर येथील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबात जन्मलेला चंद्रकांत काशीराम इंगोले, या युवकाची अक्षय्य उर्जेचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य करणाऱ्या १८० पेक्षा अधिक देशांचा समावेश असलेल्या आंतर सरकारी संस्थेत नियुक्ती झाली आहे. तो संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे प्रोग्राम ऑफिसर म्हणून २७ सप्टेेंबरला रुजू होणार आहे.
अत्यंत सामान्य कुटूंबात जन्मलेल्या चंद्रकांत इंगोले याने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण काजळेश्वर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात घेतले. त्यानंतर कारंजात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पूणे येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली, तसेच इन्स्टीट्युड ऑफ रूलर मॅनेजमेंट आनंद गुजरात येथून एमबीएची पदवी प्राप्त केली. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि नुकतीच त्याची १८० पेक्षाअधिक देशांचा समावेश असलेल्या आंतर सरकारी संस्थेत (इंटर गर्व्हंमेंटल ऑर्गनायझेशन) प्रोग्राम ऑफिसर म्हणून नियुक्त झाली आहे. तो संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथून या कंपनींतील १८० देशांचा समन्वयक म्हणून कामकाज सांभाळणार आहे. तो २७ सप्टेंबरला या पदावर रुजू होणार आहे. ही संस्था जगभरात अक्षय्य उर्जेचा प्रसार आणि प्रचाराचे काम करत असून युनायटेड नेशन्सची निरीक्षक आहे. चंद्रकांत इंगोलेने यशाचे श्रेय आईवडील, ज्ञानप्रकाश विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अशोकराव उपाध्ये, सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवलाल शेठ जयस्वाल यांच्यासह गुरुजनांना दिले आहे.
आयसीआय बँकेतही राहिला मुख्य व्यवस्थापक
चंद्रकांत इंगोले याची मुंबई येथे आयसीआय बँकेच्या मुख्य व्यवस्थापक पदी नियुक्ती झाली होती. नोकरी करतानाच त्याने स्पर्धात्मक परिक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला. सद्यस्थितीत तो टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून पीएचडी करीत आहे.