मंगरुळपीर : ० ते ५ वर्षे बालकांच्या आधार नोंदणीसाठी पोस्ट व बँकेत सेवा उपलब्ध करून देऊन बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे, तर शहरातील आधार नोंदणी केंद्रसुद्धा ग्रामीण भागात बालकांच्या आधार नोंदणीसाठी हलविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँक तसेच व्यवहारासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधार नोंदणी केंद्रावर लोक सकाळपासून रांगा लावतात; परंतु सध्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी पोस्ट ऑफिस व बँकेत व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र याठिकाणी अनेकदा तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी होत नाही. तर शहरात असलेले आधार नोंदणी केंद्र हे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात हलविण्यात आले आहे. त्यामुळे येथे केवळ अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी यांना आधार नोंदणीसाठी अडचण येत आहे. शहरातील आधार केंद्रावर नोंदणीसाठी येणारे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी हे केंद्र बंद असल्याने परत जात आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने शहरातील आधार नोंदणी केंद्र पूर्ववत सुरू करून नोंदणी केंद्राची संख्यासुद्धा वाढवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सर्वसामान्य लोकांना 'आधार' नोंदणीसाठी त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:38 IST